सगळं कधीच संपत नसतं पण तरीही सगळं संपल्यासारखं वाटणं फार त्रासदायक असतं... रस्त्यात अडकून पडलो असताना रस्ताच बंद झाला तर आता पुढे काय? किंवा माझं कसं होईल? या चिंतांनी डोक्याचा भुगा होणं प्रचंड त्रासदायक असतं... यातून सुटणं गरजेचं असतं... चालता चालता कुठे तरी अधेमध्ये अडकून पडलेलं असताना अचानक हक्काची वाटच हरपून गेली, रस्ताच बंद पडला तरीही चालणं बंद होऊ शकत नाही... राजमार्ग सुटला तरीही मिळेल त्या वाटेने चालत जायचं असतं.. थिजून जाण्यापेक्षा दिसेल त्या आणि शक्य वाटेने चालत राहणं चांगलंच.. ठेचा लागलेले पाय कणखर होत जातात.. रस्त्यावरच्या धुळीत कुठेतरी हरवून गेलेली आसवं कुणाच्याही नजरेस येत नसली तरीही ती आसवं चालणाऱ्याला आधार देत असतात... अनेकदा अन् अनेकांच्या आयुष्यात फुललेल्या फुलांमागे अशाच एकांतात डोळ्यांत भरून आलेल्या अज्ञात आसवांचं सिंचन असतं... अश्रू ताकद देतात चालणाऱ्याला... अश्रू वाट करून देतात कुढत कुढत जगताना मनाच्या कोपऱ्यांमध्ये कितीतरी काळ साचून पडलेल्या भावनांच्या अडगळीला....अश्रू सारवण घालतात मनाच्या भिंतींना... त्या लखलखीत होत जातात आसवांच्या सारवणाने... पुन्हा तयार होतात नव्या जोमाने पुढे जाण्यासाठी अन् कितीतरी आघात सोसण्यासाठी...
~निरंजन🌱
#जगणं
>>Click here to continue<<